No icon

Daksh police times

महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमेवर तब्बल 70 लाखांची रोकड जप्त निवडणुकीच्या

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर एका मध्यप्रदेश पासिंगच्या इनोव्हा कारमधून तब्बल 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड कोणाची? कशासाठी नेली जात होती? याची चौकशी सुरू असून या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या राज्यात सध्या विधानसभा निवडणूक 2024 ची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अत्यंत दक्ष दिसून येत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले असून, पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करीत आहेत. दरम्यान मध्यप्रदेशातील सेंधवाकडून एक इनोव्हा क्रिस्टा कार महाराष्ट्रात शिरपूरच्या दिशेने संशयतरित्या येत असून त्यात रोकड असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पथकासह संशयित एमपी 09 डीएल 8618 क्रमांकाच्या कारला आज सायंकाळी चेक पोस्ट थांबविले. वाहनाची तपासणी केली असता मागच्या बाजूला एका प्लास्टिकच्या गोणीत रोकड आढळून आली. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी शिरपूर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळविण्यात आले. तर एफएसडी पथकाला बोलविण्यात आले. त्यानंतर पंचनामा केला असता वाहनात 70 लाखांची रोकड मिळून आली. सध्या दहा लाखापेक्षा जास्त रकमेची वाहतूक करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली असून ट्रेझरीत पाठविण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.

Comment As:

Comment (0)