Pune : Daksh Police Times
पेट्रोल पंपचालकांचा उद्यापासून बेमुदत बंद... काय आहे कारण?
- By पुणे प्रतिनिधी --
- Tuesday, 15 Oct, 2024 --
- View : 78
इंधन चोरी थांबविण्यासाठी पावले उचलण्याची मागणी असोसिएशनने वारंवार पेट्रोलियम कंपन्यांकडे केली होती. तरीही या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत
पुणे : पेट्रोलियम कंपन्यांकडून विविध मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी उद्यापासून (मंगळवार) बेमुदत बंद करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलियम कंपन्या इंधन वाहतुकीबाबत चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवत असून, इंधन चोरीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वारंवावर तक्रार करूनही पेट्रोलियम कंपन्या कार्यवाही करीत नसल्याने बंदचे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहिती पेट्रोल डिलर्स असोसिएनने दिली आहे.
असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत १५ ऑक्टोबरपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, इंधन वाहतुकीसाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अव्यवहार्य दराने निविदा काढल्या जातात आणि वितरकांना कोरे कागद अथवा करारपत्रावर सही करायला भाग पाडले जाते. पेट्रोलियम कंपन्यांकडून वाहतुकीसाठी कमी दर स्वीकारणारे अनेक वाहतूकदार इंधन चोरीमध्ये गुंतलेले आहेत. त्यातील ६५ टक्के जणांना पोलिसांनी आधी पकडलेही होते. सर्व भागधारकांना विचारात न घेता पेट्रोलियम कंपन्या पावले उचलत आहेत. यामुळे इंधनाच्या सुरक्षित वाहतुकीला हरताळ फासला जात असून, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे.
इंधन चोरी थांबविण्यासाठी पावले उचलण्याची मागणी असोसिएशनने वारंवार पेट्रोलियम कंपन्यांकडे केली होती. तरीही या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. यामुळे गेल्या दोन वर्षांत इंधन चोरीच्या १० घटनांची नोंद झाली आहे. अशाच इंधन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई केली. पेट्रोलियम कंपन्यांकडून चोरी होऊ नये यासाठी मोठा खर्च करून अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाल्याने या चोऱ्या होत आहेत, असे रुपारेल यांनी सांगितले.
पेट्रोल पंपचालकांच्या मागण्या
– इंधन वाहतुकीच्या सर्व निविदा त्वरित रद्द कराव्यात.
– सुरक्षित वाहतुकीसाठी व्यवहार्य दरांसह नवीन निविदा काढाव्यात.
– सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे.
– इंधन चोरीतील या अधिकाऱ्यांच्या सहभागाचीही पोलीस चौकशी व्हावी.
आम्ही बेमुदत बंदची सूचना पेट्रोलियम मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांना आधीच दिली आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून पेट्रोल आणि डिझेल पंपांवर योग्य प्रमाणात आणि वेळेवर पोहोचविण्याची जबाबदारी पेट्रोलियम कंपन्यांची असेल.