No icon

Pune : Daksh Police Times

बाबा सिद्धीकींच्या हत्येनंतर महायुती सरकारवर शरद पवार संतापले; म्हणाले – ‘गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने…’

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ajit Pawar NCP), माजी राज्यमंत्री बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री (दि.१२) नऊ वाजताच्या सुमारास भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली (Firing On Baba Siddique). वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात हा हल्ला करण्यात आला. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, “राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ” या प्रकरणाची केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो”, असेही त्यांनी म्हंटले.

Comment As:

Comment (0)