No icon

शिवाजीनगर : दक्ष पोलिस टाइम्स

मोबाईल चोरी करुन विक्री करणाऱ्या उच्च शिक्षीत आरोपीला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, 17 मोबाईल जप्त

मोबाईल चोरी करुन त्याचे बनावट बिल तयार करुन विक्री करणाऱ्या उच्च शिक्षीत आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून 17 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपी मुळ बिलाच्या पीडीएफ मध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करुन त्याची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत जुना तोफखाना भागातील फिर्निचर विक्रेत्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने 4 जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या दुकानातील काउंटरवर ठेवलेला मोबाईल चोरला होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरणाऱ्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध तपास पथक घेत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीकडे केलेल्या तापासमध्ये आरोपी नामांकीत इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री करणाऱ्या कंपनीच्या मोबाईलच्या मुळ बिलाच्या पीडीएफ मध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करत होता. त्याची पीडीएफ तयार करुन तो चोरी केलेला मोबाईल स्वत:चा असल्याचे भासवून मोबाईल दुकानदारास बनावट बिलाची पीडीएफ व स्वत:च्या आधार कार्डाच्या आधारे विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अटक केलेल्या आरोपीकडून 17 मोबाईल जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चीम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांच्या पथकाने केली.

पोलिसांचे दुकानदारांना आवाहन

पुणे शहर पोलिसांनी शहरातील मोबाईल दुकानदारांना आवाहन केले आहे की, मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना मोबाईल बिलाची पडताळणी करुन मगच व्यवहार करावा.
 

Comment As:

Comment (0)