No icon

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे उद्घाटन

“पुढील 25 वर्षांच्या विकसित भारताच्या प्रवासात वृत्तपत्रांची भूमिका अतिशय  महत्त्वाची”

“ज्या देशाच्या नागरिकांमध्ये त्यांच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास वाढीला लागतो ,  ते यशाची नवीन शिखरे गाठू लागतात. आज भारतातही तेच होत आहे”

"आयएनएस संस्थेने  केवळ भारताच्या प्रवासातील चढ-उतार पाहिले नाहीत  तर ते प्रत्यक्ष जगले आणि लोकांपर्यंत पोहोचवले"

“एखाद्या देशाच्या जागतिक प्रतिमेचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. भारतीय प्रकाशनांनी आपले जागतिक अस्तित्व  वाढवले पाहिजे”

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल  मधील जी-ब्लॉक येथील इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) सचिवालयाला भेट दिली आणि आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन केले.  नवीन इमारत मुंबईतील आधुनिक आणि कार्यक्षम कार्यालयाबाबत आयएनएसच्या सदस्यांच्या उदयोन्मुख  गरजा पूर्ण करेल आणि मुंबईतील वृत्तपत्र उद्योगासाठी 'नर्व्ह सेंटर '  म्हणून काम करेल. 

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नवीन इमारतीच्या  उद्घाटनाबद्दल इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आणि आशा व्यक्त केली की नवीन जागेत काम करण्याची सुलभता भारताची लोकशाही आणखी मजबूत करेल. इंडियन न्यूजपेपर सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झाली होती हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, या संस्थेने  केवळ भारताच्या प्रवासातील चढ-उतार पाहिले नाहीत  तर ते प्रत्यक्ष जगले आणि लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे, एक संघटना  म्हणून इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे कार्य जितके  प्रभावी होईल तेवढा देशाला त्याचा लाभ होईल असे पंतप्रधान म्हणाले.

माध्यमे ही देशाच्या परिस्थितीची मूक दर्शक नसून ती परिस्थिती बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात असे पंतप्रधानांनी सांगितले.  विकसित भारताच्या पुढील 25 वर्षांच्या प्रवासात त्यांनी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांची भूमिका अधोरेखित केली. नागरिकांचे  अधिकार आणि त्यामाध्यमातून निर्माण होणारी क्षमता यांच्याविषयी  जागरूकता निर्माण करण्यात माध्यमांच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. भारतात  डिजिटल व्यवहारांना मिळालेल्या यशाविषयी  सांगताना त्यांनी आत्मविश्वासपूर्ण नागरिक कसे यश प्राप्त करतात याचेच हे उदाहरण असल्याचे सांगितले. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत जगातील प्रमुख राष्ट्रे कुतूहल व्यक्त करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. या यशोगाथेतील माध्यमांच्या भागीदारीची त्यांनी प्रशंसा केली.

चर्चेच्या माध्यमातून गंभीर विषय

ऐरणीवर आणण्यात माध्यमांची निसर्गदत्त भूमिका पंतप्रधानांनी विषद केली.  माध्यमांच्या कार्यान्वयनातून सरकारी धोरणांच्या परिणामांचा त्यांनी उल्लेख केला. आर्थिक समावेशकता आणि जनधन योजना सारख्या चळवळीच्या माध्यमातून बँक खाते उघडणे आणि बँकिंग प्रणाली सोबत सुमारे 50 कोटी जनतेचे एकत्रीकरण करणे याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. डिजिटल भारतासाठी या प्रकल्पाची सर्वात जास्त मदत झाली असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासही यामुळे चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसंच स्वच्छ भारत अथवा स्टार्टअप इंडिया सारख्या उपक्रमांवर व्होट बँकेच्या राजकारणाचा  काहीही परिणाम झाला नाही असे पंतप्रधानांनी सांगितले. ही चळवळ राष्ट्रीय संभाषणाचा भाग बनवल्याबद्दल त्यांनी माध्यमांची प्रशंसा केली.

इंडियन न्यूज पेपर सोसायटी या संस्थेच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशातल्या माध्यमांना निर्देश मिळत असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की सरकारने सुरू केलेला कोणताही उपक्रम हा सरकारी कार्यक्रमच असण्याची गरज नाही तसेच कोणतीही कल्पना ही केवळ सरकारनेच अंमलात आणणे आवश्यक नाही असे ते म्हणाले. यासाठी त्यांनी आजादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या मोहिमांचे उदाहरण दिले. या  मोहिमांबाबत सरकारने सुतोवाच केले मात्र संपूर्ण देशाने या मोहिमा प्रत्यक्षात उतरवल्या असे त्यांनी सांगितले.  त्याचप्रमाणे  पर्यावरण सुरक्षेवर  सरकारने भर दिला असून हा  राजकीय पेक्षा अधिक मानवतावादी विषय असल्याचे  सांगत पंतप्रधानांनी नुकत्याच राबवलेल्या ‘एक पेड मां के नाम’ मोहिमेबाबत जगभर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.  पंतप्रधान  उपस्थित राहिलेल्या G 7 परिषदे दरम्यान जगभरातल्या  नेत्यांनी देखील  या  कार्यक्रमाबाबत अतिशय औत्सुक्य दाखवल्याचे त्यांनी सांगितले.  युवा पिढ्यांच्या भवितव्याकरता सर्व माध्यम संस्थांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. “देशासाठी एक प्रयास म्हणून अशा प्रकारचे उपक्रम पुढे नेण्यासाठी मी सर्व माध्यम गटांना आवाहन करतो” असे त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेची  पंचाहत्तरी साजरी करीत असताना  राज्यघटने बाबत नागरिकांची कर्तव्यदक्षता आणि  जागरूकता उंचावण्यात माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान म्हणाले की, पर्यटन क्षेत्रातही प्रत्येकाने एकत्रित ब्रँडिंग आणि विपणन करण्याची गरज आहे. एखाद्या विशिष्ट राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्तमानपत्रे एखादा महिना निवडू शकतात, असे त्यांनी सुचवले. यामुळे राज्यांमधील परस्पर हितसंबंध वाढतील असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी वर्तमानपत्रांना त्यांची जागतिक व्याप्ती वाढवण्याची विनंती केली. नजीकच्या भविष्यात भारताची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या वाटचालीचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताचे यश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. "एखाद्या देशाच्या जागतिक प्रतिमेचा थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो," असेही पंतप्रधानांनी निदर्शनास आणले. भारताच्या उंचावणाऱ्या दर्जासह परदेशातील भारतीय समुदायाचे वाढते महत्त्व आणि जागतिक प्रगतीमध्ये योगदान देण्याची त्यांची वाढती क्षमता यांचाही त्यांनी उल्लेख केला. संयुक्त राष्ट्रांच्या सर्व भाषांमध्ये भारतीय प्रकाशनाच्या विस्तारासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.  अशा प्रयत्नांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे प्रदान केलेल्या सुलभतेचा अंगिकार करून या प्रकाशनांची संकेतस्थळे, मायक्रोसाइट्स किंवा सोशल मीडिया खाती त्या भाषांमध्ये असू शकतात असे त्यांनी उद्धृत केले.

मुद्रित आवृत्त्यांच्या तुलनेत जागेची कोणतीही अडचण नसल्याने प्रसारमाध्यमांनी प्रकाशनाच्या डिजिटल आवृत्तीचा वापर करण्याचे आणि आज दिलेल्या सूचनांवर विचार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी भाषणाच्या समारोपावेळी केले. “मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण या सूचनांचा विचार कराल, नवीन प्रयोग कराल आणि भारताची लोकशाही बळकट कराल. तुम्ही जेवढे खंबीरपणे काम कराल तेवढी देशाची उत्तरोत्तर प्रगती होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा उपस्थित होते.

Comment As:

Comment (0)