No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

Amitesh Kumar : ‘जे झाले ते झाले, यापुढे आगीशी खेळू नका’

पुणे - शहरातील सर्व पब रात्री दीड वाजता बंद होतील. अवैध धंद्यांना मूकसंमती देणाऱ्या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. ‘लँड डिलिंग’मध्ये तोडपाणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. यापूर्वी ‘जे झाले ते झाले, यापुढे आगीशी खेळू नका, शौक असेल तर जरूर खेळा’ असा सज्जड दम पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भरला. कोणीही आमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही. कायद्याशी शत्रुत्व तर पोलिसांशी शत्रुत्व अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक फेब्रुवारीला पुणे पोलिस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील गुन्हेगारी आणि वाहतूक समस्यांचा आढावा घेतला. काही हॉटेल्स, पब आणि बारमध्ये उशिरापर्यंत मद्य विक्री सुरू असते.

वेळेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात येणार आहे. सोनसाखळी, मोबाईल हिसकावणे (स्ट्रीट क्राइम) आणि घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल

गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यात येणार आहे. तडीपार गुंड हद्दीत आढळल्यास पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यात येईल. ‘मोका’, ‘एमपीडीए’ आणि पॅरोलवर कारागृहाबाहेर आलेल्या तसेच, खून, खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा घडता कामा नये, अन्यथा संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल. गुन्हेगारी सोडून चांगले जीवन जगत असलेल्यांना त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक नियमनावर अधिक भर

शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील. केवळ कारवाइपेक्षा वाहतूक नियमनावर अधिक भर राहील. प्रमुख चौकांसह रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करण्याबाबत महापालिकेसह संबंधित घटकांशी चर्चा केली जाईल.

संचेती चौकापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नवले पूल, कात्रज ते खडी मशिन चौक, वाघोलीसह इतर भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. मोटारींना काळ्या काचा लावून फिरणाऱ्या आणि विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस ठाण्यांना पुरेसे मनुष्यबळ

शहरातील पोलिस ठाण्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ७७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात येतील.

तसेच, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पोलिस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक परिमंडळात दरबार घेणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Comment As:

Comment (0)