No icon

Daksh Police Times

माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी:पुणे महापालिकेतील

पुणे : पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना दूरध्वनी करून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास राजकीय कारकीर्द संपवून टाकेन, तसेच समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करणाची धमकी देण्यात आली आहे.
याबाबत बिडकर यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला आहे. बिडकर रविवारी (५ मे) सायंकाळी लष्कर भागातील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर परदेशातून एकाने संपर्क साधला. अनोळखी व्यक्तीने बिडकर यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास राजकीय कारकीर्द संपवून टाकू, तसेच समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करु, अशी धमकी अनोळखी क्रमांकावरून देण्यात आली. बिडकर यांनी सोमवारी याबाबत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. बिडकर यांना धमकावणारा दूरध्वनी परदेशातून करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे.

बिडकर सध्या पुणे लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. प्रचारात व्यस्त असताना बिडकर यांना धमकाविण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी बिडकर यांना धमकी देण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणात गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली हाेती.

Comment As:

Comment (0)