No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

सराईत दुचाकी चोरट्याला चाकण पोलिसांकडून अटक, 12 दुचाकी जप्त

चाकण परिसरात दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 12 दुचाकी जप्त केल्या आहेत. अशोक मधुकर सोनवणे (वय-40 रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने याठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. यापार्श्वभूमीवर वाहन चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश चाकण पोलीस ठाण्यातील तपास पथकाला देण्यात आले होते. तपास पथकाने चोरीच्या घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रेकॉर्डवरील वाहन चोर अशोक सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी अशोक सोनवणे याचे एका पेक्षा जास्त बायका असल्याने तो पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये नाव बदलून रहात होता. त्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता. तपास पथकाने अशोक सोनवणे याचा शिक्रापुर, शिरुर, राळेगण थेरपाळ, सुपे, भाळवणी तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात सलग सात दिवस शोध घेऊन त्याला अटक केली.

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून बारा दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून चाकण पोलीस ठाण्यातील 7, विश्रामबाग, कोतवाली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. तर उर्वरित तीन दुचाकींचा इंजिन नंबर व चेसी नंबर वरुन वाहन मालकांचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार सुरेश हिंगे, संदिप सोनवणे, राजु जाधव, हनुमंत कांबळे, निखिल शेटे, नितीन गुंजाळ, सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी, विवेक सानप, प्रतिक चव्हाण, माधुरी कचाटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार संतोष सुपेकर करीत आहेत.
 

Comment As:

Comment (0)