Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पोलीस अधिकारीच असुरक्षित, उपनिरीक्षकावरील हल्ला प्रकरणी तीन जण ताब्यात
Monday, 11 Nov 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पोलीस नेहमीपेक्षा अधिक कार्यरत असल्याचे चित्र असताना हिंमत वाढलेल्या टवाळखोरांनी पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला केला

नाशिक : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पोलीस नेहमीपेक्षा अधिक कार्यरत असल्याचे चित्र असताना हिंमत वाढलेल्या टवाळखोरांनी पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला केला. पोलीस आयुक्तांकडून शहरात कायदा व सुव्यवस्था असल्याचा दावा केला जात असताना पंचवटीत एकाच महिन्यात दोनदा पोलिसांवर हल्ले झाल्याने पोलिसांच्या एकूणच कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तीन टवाळखोरांना ताब्यात घेतले आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे हे सोमवारी रात्री कामावरून घरी जात असताना वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरात काही टवाळखोर मद्यपान करुन धिंगाणा घालत असल्याचे त्यांना दिसले. नेमाणे यांनी त्यांना हटकताच त्यांनी नेमाणे यांच्यावर विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात नेमाणे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी नेमाणे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात पोलीस अधिकारीच सुरक्षित नसतील तर, सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू असताना पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील एक विधीसंघर्षित बालक आहे.

दरम्यान, याआधी चार ऑक्टोबर रोजी दिंडोरी नाक्यावर सराईत गुन्हेगार विकी जाधव उर्फ गट्या (रा. अवधूतवाडी) हा हातात चाकू घेत परिसरात दहशत माजवत असतांना मध्यवर्ती गुन्हे शाखेतील सहायक उपनिरीक्षक नामदेव सोनवणे यांनी त्याला हटकले असता. दोघांमध्ये झटापट झाली. संशयित गट्याने सोनवणे यांच्या पोटात चाकू खुपसत त्यांना जखमी केले होते. परंतु, त्या स्थितीतही सोनवणे यांनी त्यास पकडून ठेवले होते. आपल्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊ लागल्याने पोलीस आयुक्त आता तरी कठोर भूमिका घेतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.