Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे (भापोसे) यांनी व्हर्चुअल टाऊन हॉल मिटींग 'X' (पुर्वीचे ट्विटर) वर चर्चेसाठी आयोजित केले.
Wednesday, 04 Sep 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे (भापोसे) यांनी पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी व्हच्र्युअल टाऊन हॉलचे आयोजन केले. हे संवादात्मक सत्र 'X' (पुर्वीचे ट्विटर) या माध्यमावर दुपारी ४ वाजल्यापासून सुरू झाले. या अनोख्या उपक्रमाचे उद्दिष्ट पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी येथील नागरिकांच्या बालसुरक्षा, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेसंबंधी मुद्द्यांवर नागरिकांनी मांडलेल्या समस्यां जाणुन घेवुन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
या सत्राला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, ज्यात त्यांनी अनेक मुद्दे मांडले आणि रचनात्मक सूचना दिल्या. संवादा दरम्यान खालील महत्त्वाच्या मुद्द्द्यांवर चर्चा झाली.
शाळा परिसरात काही गैरवर्तनाच्या घटनांचा विचार करता, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत नागरिकांनी मुद्दे उपस्थित केले. त्यात सीसीटीव्ही देखरेख, शालेय कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी, पॉक्सो मार्गदर्शक तत्त्वांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा रक्षकांची उपस्थिती हे काही मुद्दे होते.
मा. पोलीस आयुक्त यांनी डिसेंबर २०२३ मध्ये सुरू केलेल्या 'वन डे फॉर स्कूल' या उपक्रमाचा उल्लेख केला. या उपक्रमाद्वारे ३०० हून अधिक शाळा आणि ६५,००० विद्यार्थी यांना गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती देण्यात आली आहे, तसेच पॉक्सो मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा करण्यात आली आहे. शाळांना सीसीटीव्ही बसविण्याची, कर्मचाऱ्यांची अनिवार्य पोलिस पडताळणी करण्याची, विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेट्या ठेवण्याची आणि विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी पॉक्सो मार्गदर्शक तत्त्वे व माहितीपर सत्र आयोजित करण्याची मागणी केली. त्यावर मा. पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदार हे सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण व माहीती देण्यासाठी उपलब्ध आहेत त्याबाबत शाळांनी या व्हॉटसअॅपद्वारे ९५२९६९१९६६ वर संपर्क साधावा.
नागरिकांनी वाहतूक कोंडीबाबतचे प्रश्न विचारले. त्याबाबत मा. आयुक्तांनी सांगितले की, वाहतूक शाखा, PCMC, PWD, आणि NHAI यांनी संयुक्तपणे २६ वाहतूक कोंडीचे पॉइंट्स ओळखले आहेत, ज्यावर उपाययोजना अंमलबजावणी सुरु आहे.
चाकणमध्ये तळेगाव चौक आणि आळंदी फाटा यासह ११ ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्यात आले आहेत.

हिंजवडीत, विप्रो सर्कल आणि राधा चौक यांसारख्या प्रमुख भार्गाचा आढावा घेतला जात आहे, आणि रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियमन उपाययोजना सुरू आहेत.
सायबर गुन्हे, विशेषतः ऑनलाइन फसवणुकीमध्ये वाढ, ही चर्चा केलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती. शेअर बाजारात गुंतवणूक फसवणूक या ऑनलाईन टास्क फ्रॉडची माहिती दिली.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी यावर्षी २१६ सायबर गुन्ह्यांची नोंद केली असून ७२ जणांना अटक करण्यात आलेली आहे. २.५ कोटींहून अधिक रक्कम पीडितांना परत करण्यात आली आहे. तसेच, २७ कोटींची रक्कम होल्ड/लिन करण्यात आलेली आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी नागरिकांना राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलद्वारे किंवा १९३० या क्रमांकावर कॉल करून तात्काळ सायबर फसवणुकीची तक्रार करण्याचे आवाहन केले.
गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी शांतता समित्यांच्या बैठका, गणपती मंडळे आणि इतर सरकारी विभागांसोबत बैठका आयोजित करुन समन्वय साधला आहे. संपूर्ण उत्सव काळात वाहतूक व्यवस्थापनाकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल, सणाच्या काळात ध्वनी प्रदूषणाशी संबंधित आदेश/मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी गणेश मंडळांना परवाने सुलभतेने मिळवण्यासाठी एक खिडकी प्रणाली सुरू केली आहे. तसेच विसर्जन मार्गाचे विश्लेषण करुन ३० ठिकाणी वाहतूक वळविण्याचे नियोजन केले आहे. लवकरच याबाबत सविस्तर पत्रक काढण्यात येईल.
या व्हर्चुअल टाउनहॉल सत्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि सत्र एका तासाचे
नियोजित असताना, ते एक तासाने वाढवावे लागले. या उपक्रमातून नागरिकांनी त्यांच्या समस्या, निरीक्षणे, आणि सूचना मांडण्याची संधी मिळाली.
अशाप्रकारे नागरिकांच्या विविध प्रश्नांस आयुक्तांनी दिलखुलास उत्तरे दिल्याने नागरिकांनी आभार व्यक्त करुन असे उपक्रम वारंवार घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.