Daksh Police Times
Daksh Police Times पुण्याच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर एक अतृप्त आत्मा अशी बोचरी टीका केली...
Tuesday, 30 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

 पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या सत्ताकाळावर टीका करताना म्हणाले, २०१४ च्या आधी दहा वर्षांत तुमच्याकडून महागाई आणि भ्रष्टाचारासाठी डबल टॅक्स वसूल केला गेला. २०१४ नंतर आम्ही महागाई आटोक्यात आणली भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई केली. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात आयोजित प्रचार सभेत बोलताना केला.

महायुतीचे  पुण्यातील लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि अन्य तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे पुण्यातील रेसकोर्सयेथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान बोलत होते.

मोदी पुढे म्हणाले, दहा वर्षांमध्ये कर चुकवणाऱ्यांना आम्ही सवलती दिल्या आहेत. सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. त्यामुळे देशभरातल्या करदात्यांची अडीच लाख कोटींची बचत झाली. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब आनंदात आहेत, असा आणखी एक दावा मोदींनी केला.

तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मा असतो. त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही तर ते दुसऱ्याच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात. ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली.अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तरआपल्या पक्षात, कुटुंबातही ते असंच करतात, अशी टीका मोदींनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली.

शरद पवारांवर टीका करताना ते पुढे म्हणाले, १९९५ मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपाचे सरकार अस्थिर करु पाहात होता. २०१९ मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केले ते महाराष्ट्राला माहीत आहेच. आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या अतृप्त आत्म्याने सुरु केला आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,भाजपासह महायुती सरकार महाराष्ट्राला पुढे नेत आहे.मात्र दुसरीकडे इंडिया आघाडी काँग्रेसच्या युवराजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांना विचारा गरीबी कशी हटते तर ते म्हणतात खटाखट, खटाखट.युवराजांना विचारा विकसित भारताची योजना काय तर ते म्हणतात टकाटक टकाटक.यांच्या युवराजांमुळेच लोक त्यांचा पक्ष सोडून जात आहेत, असे म्हणत मोदींनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली.

मोदी सरकारचे कार्य सांगताना ते म्हणाले, आयुषमान योजनेच्या अंतर्गत जनऔषधी केंद्रही आम्ही सुरु केली आहेत.त्यामध्ये ८० टक्के सवलतीच्या दरांत औषधे विकली जातात.गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्तात औषधं मिळतात. यातून देशभरात मध्यमवर्गीय,गरीब यांचे दीड लाख कोटी रुपये वाचले आहेत.