Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पिंपळे गुरवमध्ये सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात
Tuesday, 30 Apr 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

नवी सांगवी : भारतीय हिंदू संस्कृती मधील सोळा संस्कारांपैकी महत्वाचा समजला जाणाऱ्या उपनयन संस्कारासाठी पांचाळ सोनार समाजातील सुवर्ण पुष्प संस्था, आम्ही सांगवीकर ग्रुप यांच्या वतीने सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २८ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. या संस्काराचे पौराहित्य वेदमूर्ती अनुपसिंह दीक्षित, माधव वेदपाठक, श्याम पंडित यांनी केले. यावेळी बटूंना गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली.
     पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे सोमवारी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण पुणे शहरासह  विविध भागातून बटूंचा यामध्ये सहभाग होता. अत्यंत नियोजनबध्द आणि शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या सोहळ्याची सुरवात श्रीगणेश पूजन करून करण्यात आली. ग्रहयज्ञ, देवप्रतिष्ठा, चौल, मातृभोजन, भिक्षावळ व भोजन या कार्यक्रमांचा समावेश होता. सकाळी साडे सहा पासून अत्यंत उत्साहात मंगलवाद्यांच्या मंजुळ सुरात व्रतबंध संस्काराचा हा कार्यक्रम सुरू झाला. सव्वा बाराच्या मुहूर्तावर टाळ्यांच्या गजरात व गुलाबपुष्पांच्या वर्षावात पांचाळ सोनार समाजबांधव, मान्यवरांच्या उपस्थितीत हा देखणा सोहळा पार पडला.
    दरम्यान सोहळ्यातील मातृभोजनाच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानिमित्ताने सर्व बटूंची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. व्रतबंध सोहळा सामुदायिक असतानाही सर्व मुंजी ठरलेल्या मुहूर्तावर वेळेत पार पडल्या त्यामुळे बटूंच्या पालकांकडून आयोजकांचे विशेष कौतुक होताना यावेळी पाहावयास मिळाले. या कार्यक्रमाला पांचाळ सोनार समाजातील महिला व जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बटूंना आशीर्वाद देण्यासाठी उद्योजक विजय जगताप, संतोष खर्डेकर, कुमार वेदपाठक, उषा ढोरे, महेश जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, शशिकांत कदम, शारदा सोनवणे, शिवाजी कदम, हिरेन सोनवणे, डॉ. देविदास शेलार यांचेसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बटूंना आशीर्वाद दिले. 
     सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पांचाळ सोनार समाजाचे सुवर्ण पुष्प संस्थेचे अध्यक्ष संजय घोडके, उपाध्यक्ष विनिता धर्माधिकारी, सचिव पी. ई. धर्माधिकारी, चक्रधर दीक्षित, लक्ष्मीकांत दीक्षित, कल्याणी दीक्षित, संगीता दीक्षित, प्रा. सुनील पंडित, राजू पोतदार, प्रीतम पोतदार, सुलभा वेदपाठक, राधिका दीक्षित यांनी अथक परिश्रम घेतले.