Daksh Police Times
पुणे: दक्ष पोलिस टाइम्स भारती विद्यापीठ परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 93 वी कारवाई
Monday, 22 Jan 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

 Pune Police MPDA Action | भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार गणेश उर्फ भावड्या बाबु ओव्हाळ (वय-24 रा. जय शिवाजी चौक, आंबेगाव बुद्रुक, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 93 वी कारवाई आहे.

गणेश ओव्हाळ हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता यासारख्या हत्यारासह खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील दोन वर्षात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

गणेश ओव्हाळ याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी गणेश उर्फ भावड्या ओव्हाळ याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.