Daksh Police Times
पिंपरी : दक्ष पोलिस टाइम्स पिंपरी चिंचवड : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर, ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई
Tuesday, 02 Jan 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

पिंपरी चिंचवड : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ५१ गुन्हेगारी टोळ्यांमधील ३५७ आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील काही प्रमाणात गुन्हेगारी कमी होऊ शकते.

पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे अनेकदा आढळते. गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी नेहमीच त्यांनी कठोर पावलं उचललेली आहेत. आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बारा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये या गुन्हेगारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, तोडफोड करणे, विनयभंग करणे, अपहरण, खंडणी, दंगा, अश्लील वर्तन करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या तीन सराफांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेली आहे.